पुणे – येत्या काही महिन्यांत उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक होत असताना भाजपने ३६ राज्यांमधील प्रभारी आणि सहप्रभारी यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पुण्याच्या राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची उत्तर प्रदेश सहप्रभारीपदी निवड केली आहे. विधानसभा व २०२९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक लक्षात घेता ही निवड महत्त्वाची आहे.
काही महिन्यांपूर्वी संसदीय स्थायी समितीच्या (विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल) अध्यक्षपदी डॉ. मेधा कुलकर्णी यांची निवड झाली आहे. त्यानंतर ही जबाबदारी मिळाली आहे. उत्तर प्रदेशच्या प्रभारी पदाची सूत्रे विनोद तावडे यांच्याकडे, तर आता सहप्रभारी म्हणून मेधा कुलकर्णी कार्यरत असणार आहेत.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘पक्षाच्या नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशचा विकास सुरू आहे. येणाऱ्या काळात अधिक चांगल्या पद्धतीने उत्तर प्रदेशचा विकास होईल. यामध्ये माझा सहभाग असेल याचा मला विशेष आनंद आहे.’
