पिंपरी – पिंपरी चिंचवड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करुन एका सराईत सोनसाखळी चोराच्या त्याच्या साथीदारासहित मुसक्या आवळल्या. चोरट्याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तब्बल ४०० ते ५०० सीसी टीव्ही कॅमेरा फुटेज तपासून मुंबई पर्यंत माग काढला. ही धडाकेबाज कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने केली.
शहरातील वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी गुन्ह्यांचा छडा लावून आरोपीना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चेन चोरीची घटना घडल्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन आरोपींचा माग काढून त्यांची ओळख पटविण्याचे काम केले. दरम्यान, निगडी पोलीस ठाणे गुन्ह्यातील सोनसाखळी चोरीच्या घटनेचा तपास करताना पोलिसांनी सुमारे ४०० ते ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून मुंबईपर्यंत आरोपींचा माग काढला असता या गुन्ह्यातील फिदा इराणी आणि आदित्य मनलोर या दोन सराईत चोरट्यांची नावे निष्पन्न झाली.
त्यानंतर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फिदा इराणी आणि त्याचा साथीदार मुकेश नेटके याला ५ सप्टेंबर २०२६ रोजी देहूरोड परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून ३४ लाख ३३ हजार रुपये किमतीचे तब्बल २७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत सोनसाखळी चोरीचे तब्बल १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी केलेल्या तपासात फिदा इराणी याने त्याचा साथीदार आदित्य मनलोर, तसेच काशिम जाफर हुसेन यांच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी सोनसाखळी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १३ ठिकाणी, तर पुणे शहराच्या हद्दीत २ ठिकाणी, अशा एकूण १५ सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला.
