रिक्षाचा धक्का बसला आणि ड्रेनेजच्या उघड्या खड्ड्यात पडले ; ५५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

रिक्षाचा धक्का बसला आणि ड्रेनेजच्या उघड्या खड्ड्यात पडले ; ५५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
Share

पुणे- रस्त्यावरून पायी निघालेल्या एका व्यक्तीला रिक्षाचा धक्का बसला. तोल गेल्यामुळे ती व्यक्ती थेट रस्त्याच्या कडेला ड्रेनेजसाठी खोदलेल्या १० ते १५ फूट खोल खड्ड्यात पडला. या घटनेत उपचार दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.१७) येरवडा येथील मच्छी मार्केट परिसरात घडली.

प्रदीप परदेशी (वय ५५ वर्ष) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण गंभीर जखमी झाल्यामुळे उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर मृत प्रदीप परदेशी यांच्या नातेवाइकांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेला जबाबदार कोण, तसेच कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना का करण्यात आल्या नव्हत्या, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, ड्रेनेजच्या कामासाठी खोदण्यात आलेला खड्डा सुमारे १० ते १५ फूट खोल होता. खड्ड्याभोवती सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दुर्घटनेची नेमकी परिस्थिती, सुरक्षाव्यवस्थेची स्थिती आणि संभाव्य जबाबदारी याबाबत तपासातून पुढील माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

 

Vedh News