पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने जवळ आले आणि…..; बारामती येथे उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर हल्ला

बारामती – प्रसिद्ध उद्योजक आणि राणा शिपिंग कंपनीचे प्रमुख राणा दिलीप सूर्यवंशी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करण्याचा आणि शस्त्राने वार करण्याचा प्रयत्न केला. घटनेमुळे बारामती शहर आणि पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने ते या हल्ल्यातून बचावले असून त्यांच्या हाताला मार लागला आहे. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु आहेत. ही घटना बारामती विमानतळ परिसरात काल रविवारी (दि.१८) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, राणा सूर्यवंशी विमानतळ परिसरात असताना पुष्पगुच्छ देण्याच्या बहाण्याने हल्लेखोर त्यांच्याजवळ आले. त्यानंतर अचानक जवळून गोळीबार करून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात सूर्यवंशी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तातडीने बारामती येथील खासगी रुग्णालयात (सिटी हेल्थ केअर) दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हा हल्ला व्यावसायिक वादातून झाला की अन्य काही कारणाने, याचा तपास पोलीस करत आहेत.






