सर्वपित्री अमावस्येला ८२ बेवारस अस्थींचे विसर्जन; राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महापालिकेचा संयुक्त उपक्रम

पुणे- मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने अखेरचा निरोप मिळावा, या अत्यंत संवेदनशील आणि मानवीय भावनेतून राष्ट्रीय कला अकादमी आणि पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सर्वपित्री अमावस्येनिमित्त तब्बल ८२ बेवारस मृतांच्या अस्थींचे विधिवत पूजन करून नदीत विसर्जन करण्यात आले. या सामाजिक व मानवीय उपक्रमाचे हे सलग सोळावे वर्ष आहे.
पुण्यातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संगम घाट येथे हा विधी संपन्न झाला. यावेळी साहाय्यक आयुक्त भास्कर महाडिक, विभागीय आरोग्य निरीक्षक सुनील तंवर, आरोग्य निरीक्षक निखिल शेंडगे, सचिन निकाळजे, विक्रम सरोदे, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, डॉ. मिलिंद भोई, राष्ट्रीय कला अकादमीचे मंदार रांजेकर, अमर लांडे, योगेश गोलांडे, किरण फाळके यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक आणि भारतीय नौदलाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना राष्ट्रीय कला अकादमीचे मंदार रांजेकर म्हणाले, “हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार मृत व्यक्तीच्या अस्थींचे विसर्जन केल्याने आत्म्यास शांती व मोक्ष प्राप्त होतो, अशी धारणा आहे. मात्र, अपघात किंवा अन्य दुर्दैवी कारणांमुळे मृत्युमुखी पडलेल्या अनेक अज्ञात व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांची ओळख पटत नाही आणि त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी नातेवाईकही उपलब्ध होत नाहीत. अशा बेवारस मृत व्यक्तींनाही सन्मानाने अखेरचा निरोप मिळावा, याच उद्देशाने राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी सर्वपित्री अमावस्येला हा स्तुत्य उपक्रम सातत्याने राबविण्यात येतो.”





