नाशिकमध्ये आणखी एक भोंदूबाबा , पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा

नाशिक- नाशिकचा तथाकथित भोंदूबाबा अशोक खरात हा फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार आणि लैंगिक शोषणाच्या गंभीर गुन्ह्यांत अडकला असतानाच आता याच जिल्ह्यातून आणखी एका भोंदूबाबाचे कारनामे समोर आले आहेत.
अरुण धोंडू पाटील (रा. शिवाजीनगर)असे या तथाकथित भोंदूचे नाव असून पूजेच्या नावाखाली त्याने किती जणांना गंडा घातला, याचा पोलीस तपास करत आहेत. अस्थमा बरा करण्यापासून घरात ‘पैशांचा पाऊस’ पाडण्यापर्यंतच्या आमिषांनी एका महिलेकडून लाखो रुपये उकळल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर पाटील पसार झाला. गंगापूर पोलिसांत दाखल गुन्ह्यानुसार फेब्रुवारी २०२२ पासून आतापर्यंत विविध ठिकाणी हा प्रकार घडला. संशयित अरुण पाटील याने स्वतःला भोंदूबाबा किंवा महाराज भासवून फिर्यादीशी संपर्क साधला.
फिर्यादी महिलेचा अस्थमा पूर्ण बरा झाल्यासारखा वाटल्याने पाटीलने पैशांचा पाऊस पाडण्यासाठी पाच लाखांची व्यवस्था करण्यास पीडितेला सांगितले. वर्षभरात फिर्यादीने हे पैसे जमवले. त्यानंतर पाटीलने पूजा केली. ‘तुमच्या घरी पैशांचा पाऊस पडेल,’ असे सांगून पाठवले. घरी पोहोचल्यावर खूप वाट पाहूनही पैशांचा पाऊस पडला नाही. भोंदूकडे विचारणा केल्यावर ‘घरी जाताना डोळ्यांची पट्टी काढली असेल किंवा मासिक पाळी आली असेल. त्यामुळे पाऊस पडला नाही,’ अशी खोटी कारणे सांगून तो टाळाटाळ करू लागला. त्याने राज्यातील अनेक नागरिकांसह राजकीय व्यक्ती व लोकप्रतिनिधींना गंडवल्याचा संशय व्यक्त होत आहे.
संशयित पाटील हा दसऱ्यानिमित्त कोट्यवधी रुपयांची आलिशान कार खरेदी करणार होता. मात्र, गुन्हा दाखल झाल्याने सोमवारपासून (दि. १९) पाटील पसार असून त्याचे शेवटचे ‘लोकेशन’ महिरावणीच्या पुढील भागात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. जमीन खरेदी-विक्री करणारा अरुण पाटील अचानक ‘महाराज’ कसा झाला आणि धबधब्याकाठी अघोरी पूजेच्या नावाखाली त्याने किती जणांना गंडा घातला, याचा पोलीस शोध काढत आहेत.





