महायुतीच्या एकत्रित ताकदीमुळे स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

पिंपरी- भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या महायुतीतील सर्व घटक पक्षांची पिंपरी-चिंचवड शहरात मोठी ताकद असून, सर्वांच्या एकजुटीमुळे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. आकुर्डी येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यात दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात महायुतीचा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ बोलत होते. या मेळाव्यास महापौर रवी लांडगे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, विलास लांडे, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेनेचे शहरप्रमुख नीलेश तरस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, भाजपचे शहर प्रभारी भरत पाटील, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शिक्षक आणि मतदार उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, “पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी येत्या शुक्रवारी मतदान होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पदवीधर मतदारसंघाचे ७ हजार २८१, तर शिक्षक मतदारसंघाचे २ हजार ९४ मतदार आहेत. या सुमारे नऊ हजार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महायुतीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करत आहेत. शहरात अनुभवी नेत्यांची मोठी फळी असून, त्याचा निश्चितच फायदा दोन्ही उमेदवारांना होईल. पुणे विभाग हा गेल्या २५ वर्षांपासून भाजपचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. यंदाही हा मतदारसंघ महायुतीकडे कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विद्यापीठे, आयआयटी आणि अन्य शैक्षणिक संस्थांचा विस्तार झाला असून, शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिक्षण क्षेत्रात अनेक सकारात्मक निर्णय घेतले असून, शिक्षक भरती सुरू केली आहे. शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबतही सरकार सकारात्मक असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. डॉ. स्मिता जाधव यांची महिला, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कामामुळे स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. तसेच, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा पश्चिम महाराष्ट्रात चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना मतदारांचा पाठिंबा मिळेल, असेही मोहोळ म्हणाले.
भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले की, शहरातील भाजपचे सर्व १४ मंडलाध्यक्ष प्रचारासाठी मेहनत घेत आहेत. महापालिका निवडणुकीनंतर महायुतीचे सर्व घटक पक्ष पुन्हा एकाच व्यासपीठावर आले असून, एकजुटीने काम करत आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून दोन्ही उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
माजी आमदार विलास लांडे यांनी शहरातील पदवीधर आणि शिक्षक मतदारांची संख्या लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना केली. प्रत्येक २५ मतदारांमागे एका कार्यकर्त्याची जबाबदारी निश्चित केल्यास मतदानाचे योग्य नियोजन करता येईल, असे ते म्हणाले.
शिवसेनेचे शहरप्रमुख नीलेश तरस यांनी शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या माध्यमातून दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. डॉ. स्मिता जाधव यांना शिवसेनेचा शंभर टक्के पाठिंबा असून, त्या निश्चित विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याचे सांगितले. पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्ते काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुशिक्षित मतदारांची असल्याने सर्वांनी ती गांभीर्याने घ्यावी, असे आवाहन केले. डॉ. स्मिता जाधव यांच्या उमेदवारीमुळे शहराच्या राजकारणात नवीन पायाभरणी होत असल्याचेही ते म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी डॉ. स्मिता जाधव यांना जास्तीत जास्त मतदान मिळवून देण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. त्या आपल्या लहान बहिणीसारख्या असून, त्यांच्या विजयासाठी पक्षाचे कार्यकर्ते पूर्ण ताकदीने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोरेश्वर शेडगे यांनी सूत्रसंचालन केले, तर सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी आभार मानले.





