१० स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर होणार का शिक्कामोर्तब ? शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेकडे इच्छुकांचे लागले लक्ष

१० स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर होणार का शिक्कामोर्तब ? शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेकडे इच्छुकांचे लागले लक्ष
Share

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपचा कारभार सुरू होऊन सुमारे दहा महिन्यांचा कालावधी उलटला असला, तरी अद्याप दहा स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा तिढा सुटलेला नाही. मात्र, येत्या शुक्रवारी (दि. २०) आयोजित केलेल्या दोन तहकूब आणि एका नियमित मासिक अशा तीन सभांमध्ये या विषयावर शिक्कामोर्तब होऊन इच्छुकांची प्रतीक्षा संपणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

महापालिका निवडणुकीत भाजपने ८४, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ३६ जागांवर विजय मिळवला आहे. या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांपैकी भाजपच्या वाट्याला सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला तीन जागा येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातील तीन जागांसाठी माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, राजेंद्र जगताप आणि फजल शेख यांची नावे यापूर्वीच निश्चित करून प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर सादर केला आहे.

दुसरीकडे, भाजपच्या वाट्याला येणाऱ्या सात जागांसाठी पक्षात तब्बल दीडशेपेक्षा अधिक इच्छुकांनी दावा ठोकला आहे. यामध्ये माजी नगरसेवक, पराभूत उमेदवार, निवडणुकीतून माघार घेतलेले कार्यकर्ते तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विविध हिंदुत्ववादी आणि कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सत्तेतील वाटेकरी वाढू नयेत आणि विरोधकांची कोंडी व्हावी, यासाठी भाजपकडून निवड लांबणीवर टाकली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी स्थानिक आमदारांपासून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच शुक्रवारी होणाऱ्या तहकूब सभेच्या विषयपत्रिकेवर हा विषय पहिल्या क्रमांकावर असल्याने प्रत्येक इच्छुकांच्या निवडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Vedh News