पुणे- महापालिकेत कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अभियंता, उपायुक्त अशा वेगवेगळ्या पदावर नोकरी लावून देतो असे सांगून एका भामट्याने एकाला १५ लाख रुपयाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी धायरी येथील ३५ वर्षीय तरुणाने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शिवानंद बाळासाहेब पाटील (वय ४५ रा. आनंद कॉलनी, कर्वेनगर ) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला शिवानंद पाटील याने आपण महापालिकेत क्रीडा अधीक्षक म्हणून नोकरीस असून मंत्रालयामध्ये चांगली ओळख असल्याचे सांगून महापालिकेत कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ अभियंता, उपायुक्त अशा वेगवेगळ्या पदावर नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून फिर्यादीकडून १५ लाख रुपये घेतले. त्यानंतर पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या सहीचे बनावट पत्र, बनावट बदली आदेश, आणि बनावट ओळखपत्र देऊन कोणतीही नोकरी न लावता फसवणूक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक हिवरकर करीत आहेत.
