पुणे – पोलीस रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले आहे. सिंहगड पोलिसांनी ३० जुलै रोजी ही कारवाई केली.
यश उर्फ दादया कमलाकर घोलप, वय 18 वर्षे, रा. आझाद मित्र मंडळ जवळ, चरवडवस्ती) असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
पुणे शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जुलै रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आणि त्यांचे पोलीस कर्मचारी सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार विनायक मोहिते आणि सागर शेडगे यांना खात्रीलायक बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी “दाद्या घोलप” याच्याकडे गावठी पिस्तूल आहे.
दाद्या हा इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोरील नवीन डीपी रोड, कल्पतरू ब्लॉसम सोसायटीच्या लेबर कॅम्पजवळ, सनसिटी रोड येथे थांबला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 40,000/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि 1000/- रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस आढळून आले. त्याच्यावर आर्म्स अॅक्ट कलम 3(25) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1), 135 अन्वये गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर करत आहेत.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
