चिंचवड येथे कोयत्याने कार फोडून नागरिकांना जीवे मारण्याची धमकी; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

चिंचवड येथे कोयत्याने कार फोडून नागरिकांना जीवे मारण्याची धमकी; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Share

चिंचवड- चिंचवडच्या संभाजीनगर परिसरात पाच जणांच्या टोळक्याने कारवर लोखंडी कोयत्याने हल्ला करून तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी निगडी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी ऋषिकेश संजय वराडी (वय २८) यांनी फिर्याद दिली असून निगडी पोलिसांनी नागेश चोपडे, अभिषेक यादव, अभिषेक गोसावी, सिद्धार्थ माने आणि एका साथीदाराविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीनुसार, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास वृंदावन सोसायटीसमोर, रामेश्वर मंदिराजवळ ऋषिकेश संजय वराडी यांची रस्त्यालगत पार्क केलेली फोक्सवॅगन व्हेंटो (MH १४ CS १६२५) कार आरोपींनी लोखंडी कोयत्याने फोडली. या हल्ल्यात कारच्या काचा व बोनेटचे अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले.

कारची तोडफोड करताना आरोपींनी उपस्थित नागरिकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आरोपींचा शोध सुरू असून पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

 

 

 

Vedh News