आळंदी सुन्न ! दिवेआगार दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

आळंदी सुन्न ! दिवेआगार दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्यांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार 
Share

आळंदी – रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर सहलीदरम्यान समुद्रात बुडून मृत्यू झालेल्या ८ विद्यार्थ्यांपैकी आळंदीच्या ६ विद्यार्थ्यांवर शुक्रवारी (२ ऑक्टोबर २०२६) अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अन्य दोन विद्यार्थ्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले. 

मृत विद्यार्थ्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी आळंदीत आणण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण आळंदी शहरात स्वयंस्फूर्त बंद पाळण्यात आला व नागरिकांनी शोकाकुल कुटुंबांचे सांत्वन केले.

आळंदीजवळील केळगाव स्मशानभूमीत आणि स्थानिक स्मशानभूमीत विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. आठ मृत विद्यार्थ्यांपैकी सुमीत भरत अहिरे, तन्मय दत्तात्रय वहिले,प्रणव रामदास बनसोडे व कैवल्य सतीश वासनकर या चार विद्यार्थ्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात आळंदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोहम तुकाराम भांडवलकर व राजवीर युवराज वहिले या दोन विद्यार्थ्यांच्या पार्थिवावर आळंदी नजीकच्या केळगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर यश किरण वानखेडे (अमरावती) व कौस्तुभ संदीप दौंड (श्रीरामपूर, अहिल्यानगर) या विद्यार्थ्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी गावी नेण्यात आले. मृत विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थितांचे हृदय पिळवटून गेले.

सहलीला गेलेले उर्वरित ३६ विद्यार्थी व ४ शिक्षक सुरक्षितपणे आळंदीत परतले असून त्यांना पोलिसांच्या उपस्थितीत पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी विनर्स अकॅडमीवर तात्काळ कारवाई करून ती सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शहरातील इतर खासगी कोचिंग क्लास आणि शैक्षणिक संस्थांची सखोल चौकशीसाठी विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालानंतर ज्या खासगी क्लासेस, शैक्षणिक संस्था यांच्याकडे वैध परवाने किंवा सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात नसेल तर अशा संस्था कायदेशीर कारवाई करून बंद केल्या जातील असे जाहीर केले आहे.

Vedh News