ब्रेकिंग न्यूज

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रवासी बसला अचानक आग; मोठी दुर्घटना टळली

Share

लोणावळा- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खासगी प्रवासी बसला अचानक भीषण आग लागली. ही घटना गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, या दुर्घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, MP ४४ ZB ६७७६ क्रमांकाची बस मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करत असताना अचानक बसमधून धूर येऊ लागला. आग वेगाने पसरत असल्याचे लक्षात येताच चालक आणि सर्व प्रवाशांनी प्रसंगावधान राखत गाडीतून खाली उडी घेतल्याने मोठी जीवितहानी टळली. बसमध्ये १४ प्रवासी होते, मात्र सर्वांची सुखरूप सुटका झाली. मात्र, या दुर्घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली.

घटनेची माहिती मिळताच आयआरबी देवदूत रेस्क्यू टीम आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून बसला लागलेली आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, एसी (AC) मधील तांत्रिक बिघाडामुळे चालत्या बसने अचानक पेट घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.