मुंबईत भीषण आगीच्या घटना ! फटाक्यांच्या दुकानात स्फोट होऊन १६ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू
मुंबई – मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात फटाक्यांच्या दुकानात झालेल्या भीषण स्फोटानंतर दुकानाचा स्लॅब कोसळून १६ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अब्दुल हमीद मार्गावरील तळमजल्यावर असलेल्या फटाक्यांच्या दुकानात ही घटना घडली. फटाक्यांचा स्फोट झाल्यानंतर दुकानात आग लागली आणि दुकानाचा स्लॅब कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
शहनवाज नियाज खान असं या १६ वर्षीय मृत मुलाचे नाव आहे. या आगीत तो १०० टक्के भाजला. आगीची घटना घडली त्यावेळी एक मुलगा बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. अग्निशमन दल आणि बचाव पथकाकडून शोध सुरू असताना दुकानाच्या आत मुलाचा मृतदेह आढळून आला. रात्री साडेदहाच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आगीची दुसरी घटना मंगळवारी, पाडव्याच्या दिवशी वडाळा परिसरात घडली. मुंबईतील वडाळा भागात पोलीस वसाहतीत आग लागून सिलेंडरचे स्फोट झाले.
आतापर्यंत 3 सिलेंडरचे स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
