लाचखोर पीएसआय एसीबीच्या जाळ्यात ! मागितली १ लाख ३० हजार रुपयांची लाच

मुंबई – मुंबई पोलीस दलातून धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. बोरिवली पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला १ लाख ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेने मुंबई पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
ज्ञानेश्वर पराडे असे या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, या प्रकरणातील मूळ तक्रारदार आणि त्यांच्या दोन बहिणींवर अटकेची टांगती तलवार होती. या कायदेशीर कारवाईपासून वाचवण्यासाठी आणि कोणतीही अटक न करण्यासाठी आरोपी पराडे याने तक्रारदाराकडे सुरुवातीला पोलिसांचा ससेमिरा आणि कारवाईची भीती दाखवून तब्बल १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु, तडजोडीनंतर १ लाख ३० हजार रुपये देण्यावर शिक्कामोर्तब झाले.
दरम्यान तक्रारदाराने २९ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अधिकृत तक्रार नोंदवली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तपास करून तक्रारीची पडताळणी करून कारवाईचा निर्णय घेतला.
५ ऑक्टोबर रोजी तडजोडीअंती ठरलेली रक्कम स्वीकारताना बोरिवली पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर पराडे यांस सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले. एसीबीच्या पथकाने आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय, आरोपीच्या घराची झडती देखील ACB कडून घेतली जात आहे.






