भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

नवी दिल्ली- भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीच्या संसर्गाचा त्रास झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. आडवाणींच्या आरोग्याबद्दल सध्या कोणतीही चिंता नाही, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
अपोलो रुग्णालयाच्या पल्मोनरी डिपार्टमेंटमध्ये आडवाणी यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांचं एक पथक नजर ठेवून आहे. यापूर्वीही याच वर्षी मे महिन्यात आडवाणी यांना अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. काही दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आताही त्यांना त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात आणलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.
अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की, अडवाणी यांनी अनेक दशकं सार्वजनिक जीवनात महत्त्वाचं योगदान दिलंय. देशाच्या प्रगतीत त्यांची भूमिका कायम लक्षात राहणारी आहे. भारताच्या प्रगतीचा पाया भक्कम करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत असेही मोदी म्हणाले होते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तीन वेळा काम पाहिले. त्यांचा पहिला कार्यकाळ १९८६ ते १९९० दुसरा १९९३ ते १९९८ आणि तिसरा २००४ ते २००५ असा होता. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा मतदारवर्ग झपाट्याने विस्तारला. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने केवळ दोन जागा जिंकल्या, तर १९८९ मध्ये ८५ जागा जिंकल्या. १९९६ मध्ये भाजप लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला. अडवाणी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारमध्ये १९९८ ते २००४ पर्यंत केंद्रीय गृहमंत्री आणि २००२ ते २००४ पर्यंत उपपंतप्रधान म्हणून काम पाहिले. त्यांनी लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले.






