पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुण्यात ‘रॅपिडो’ची ‘बाईक टॅक्सी’ बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Share

पुणे- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर परिसरात रॅपिडोची टू-व्हीलर टॅक्सी (बाईक टॅक्सी) सेवा रीतसर परवानगी मिळेपर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (आरटीए) बैठकीत दिले आहेत.

महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया आणि ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने रॅपिडोच्या टू-व्हीलर सेवेविरोधात जिल्हाधिकारी आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (RTO) लेखी तक्रार व निवेदन देण्यात आले होते. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय अधिकारी, रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी आणि ओला, उबेर व रॅपिडो कंपन्यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली.

या बैठकीत रॅपिडोने बाइक टॅक्सी चालवण्यासाठी सरकारकडून आवश्यक असणारे अधिकृत परवाने व मंजुरी घेतली नसल्याची बाब समोर आली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ रॅपिडोची टू-व्हीलर सेवा बंद करण्याचे आदेश दिले.

या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले, पिंपरी-चिंचवडचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव, पिंपरी-चिंचवडचे वाहतूक पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख या प्रमुख अधिकाऱ्याঁशी विविध रिक्षा-कॅब संघटनांचे प्रतिनिधी आणि संबंधित ॲप कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी या निर्णयाचे स्वागत करत या आदेशाची पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात तातडीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. तसेच, प्रशासकीय आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे सेवा सुरू ठेवल्यास संबंधित कंपनी आणि चालकांवर गुन्हे दाखल करावेत, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.

Vedh News