ड्रग्ज विकण्यासाठी पुण्यात आला, हिंजवडी पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकला
पुणे – राजस्थानमधून ड्रग्ज विक्रीसाठी पुण्यात वाकड परिसरात आलेल्या एका इसमाला हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून २४९ ग्रॅम प्रतिबंधित एमडी ड्रग्ज, मोटारसायकल आणि दोन मोबाइल फोन असा एकूण १३ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रेमेंद्र सिंह पिता भेरू सिंह, (वय ३१ वर्षे, रा. खुडाला फलना, पाली, राजस्थान असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे.
राजस्थानमधील एक इसम पुण्यातील वाकड परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील सहायक पोलीस फौजदार नरेश बलसाने आणि पोलीस शिपाई अरुण पारधी यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि हिंजवडी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीची शहानिशा केली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने वाकड परिसरातील विनोद वस्ती येथे सापळा रचला. या सापळ्यात आरोपी अलगद सापडला.
आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे २४९ ग्रॅम प्रतिबंधित एमडी ड्रग्ज आढळून आलं. या ड्रग्जची किंमत १२ लाख ४५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
