अहिल्यानगर, पुण्यातील प्रसिद्ध संदीप हॉटेलवर आयकर विभागाची छापेमारी

अहिल्यानगर, पुण्यातील प्रसिद्ध संदीप हॉटेलवर आयकर विभागाची छापेमारी
Share

पुणे- पुणे आणि अहिल्यानगरमधील प्रसिद्ध ‘संदीप उद्योग समूहा’च्या हॉटेल्स आणि कार्यालयांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या या कारवाईत केडगाव तसेच पुण्यातील काही व्यावसायिक ठिकाणांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल संदीप तसेच अहिल्यानगरमधील हॉटेल संदीप, हॉटेल सचिन, हॉटेल उदयनराजे, संदीप प्राइड, केडगाव येथील माजी महापौर संदीप कोतकर आणि ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे निवासस्थान आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकांच्या घरांवर ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ च्या सुमारास सुरू झाली आणि १२ तासांहून अधिक काळ चालली.

आयकर विभागाच्या पुणे पथकाने ही कारवाई केली असून, आर्थिक व्यवहार, कागदपत्रे आणि डिजिटल रेकॉर्डची तपासणी करण्यात आली. पथकातील एका तुकडीने सकाळीच संचालक कोतकर यांच्या केडगाव येथील निवासस्थानी पोहोचून तपासणी सुरु केली. त्याचप्रमाणे हॉटेलच्या व्यवस्थापकाचे घर तसेच समूहाशी संबंधित केडगाव येथील एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरावरही छापा टाकण्यात आला.

आयकर विभागाकडून अद्याप यासंबंधी कोणताही अधिकृत आकडा किंवा करचुकीची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, गेल्या वर्षी कोतकर कुटुंबीयांनी ७ सीटर हेलिकॉप्टर खरेदी केले होते. ज्यामुळे हा उद्योग समूह संपूर्ण राज्यात चर्चेत आला होता. एका बाजूला शहरातील हॉटेल व्यवसायात संदीप उद्योग समूहाची ओळख, तर दुसऱ्या बाजूला कोतकर यांची राजकीय पार्श्वभूमी, यामुळे या छाप्यांची चर्चा शहरभर सुरू झाली आहे. संदीप उद्योग समूहाची हॉटेल्स त्यांच्या जेवणासाठी अत्यंत प्रसिद्ध असून अहिल्यानगर तसेच पुण्यात जेवणासाठी खवय्यांचे तासंतास वेटिंग असते.

Vedh News