हॉस्पिटल आहे की बिअर बार ? पिंपरीच्या वायसीएम हॉस्पिटलच्या शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, व्हिडिओने खळबळ

हॉस्पिटल आहे की बिअर बार ? पिंपरीच्या वायसीएम हॉस्पिटलच्या शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, व्हिडिओने खळबळ
Share

पिंपरी- एकीकडे पिंपरीच्या वायसीएम हॉस्पिटलच्या शवविच्छेदन विभागासमोर मृतांचे नातेवाईक शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्याची प्रतीक्षा करत आहेत तर दुसरीकडे याच विभागातील कर्मचारी चक्क शवविच्छेदन विभागातच दारू पार्टी करण्यात दंग असल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या सर्व प्रकारचा व्हिडिओ समोर येताच पिंपरी चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.

शवविच्छेदन विभागात चक्क मद्याची बाटली, मद्याचे पेग, चकना, जेवणाचे ताट आणि फुल्ल तर्राट झालेले कर्मचारी. हे दृश्य कोणत्याही दारूच्या बारमधील नसून पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागातील आहे. या विभागातील कर्मचारी दारू पार्टी करण्यात दंग असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

जेव्हा एक व्यक्ती मृत्यूचा दाखला घेण्यासाठी इथे गेला असताना त्याला रात्रभर बाहेर वाट बघायला लावली. अखेर इतका उशीर का होतोय, हे पाहण्यासाठी तो आत गेला असता हे धक्कादायक वास्तव समोर आले. त्याने या प्रकाराचा व्हिडिओ शूट केला. व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती समोर कोचावर झोपलेल्या व्यक्तीला विचारते की, ‘सर मृत्यूचा दाखला द्या ना. मी रात्रभर इथेच थांबलोय’ यावर झोपलेली व्यक्ती काहीतरी उद्धट उत्तर द्यायला लागते. मात्र, इतक्यात त्याचे लक्ष मोबाईलकडे गेल्यानंतर तो कॅमेरा बंद करण्यास सांगतो.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी वैभव म्हस्के असल्याचे सांगण्यात येत आहे. या अमानुष आणि बेजबाबदार प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. व्हिडीओची सत्यता तपासून या ‘संवेदनाहीन’ डॉक्टरांवर पिंपरी-चिंचवड महापालिका काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Vedh News