दीड वर्षांच्या चिमुकलीला १२ वर्षांच्या मुलीने सहाव्या मजल्यावरुन फेकले, मुंबईच्या गोरेगाव मधील घटना

दीड वर्षांच्या चिमुकलीला १२ वर्षांच्या मुलीने सहाव्या मजल्यावरुन फेकले, मुंबईच्या गोरेगाव मधील घटना
Share

मुंबई- मुंबईत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोरेगाव येथे दीड वर्षाच्या मुलीला शेजारी राहणाऱ्या १२ वर्षाच्या मुलीने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मध्ये कैद झाला आहे. या घटनेत चिमुरडीच्या डोक्याला मर बसून जागीच मृत्यू झाला.

मृत मुलीचे नाव अरिबा खान असे आहे. बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली. ही चिमुकली कुटुंबीयांसह गोरेगाव येथील शिवशाही प्रकल्पात वास्तव्यास होती. इमारतीच्या सहाव्या मजल्यावर ती आई-वडील आणि चार भावांसोबत राहत होती.

इमारतीच्या ६ व्या मजल्यावर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीने बाळाला उचलून थेट इमारतीच्या डक्टमधून खाली फेकून दिले. इमारतीतून खाली पडल्याने अत्यंत गंभीर इजा होऊन चिमुकलीचा जागेवरच करुण अंत झाला. हा संपूर्ण थरार इमारतीत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

चिमुकली बराच वेळ कुठे दिसत नसल्याने आईने एका भावाला तिला शोधायला पाठवले, पण ती कुठेही सापडली नाही. काही मिनिटे शोधल्यानंतर, तिच्या भावाने जिन्याच्या मोकळ्या जागेतून खाली पाहिले, तेव्हा त्याला जमिनीवर कोणीतरी पडलेले दिसले. तिचे कपडे त्याच्या बहिणीच्या कपड्यांसारखेच होते. त्यानंतर त्याने धावत जाऊन आईला ही गोष्ट सांगितली. या घटनेनंतर कृत्य करणाऱ्या मुलीच्या कुटुंबीयांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची (ADR) नोंद केली होती. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे १२ वर्षीय मुलगी आणि तिच्या आईला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणी पुढील सखोल चौकशी करत आहेत.

Vedh News