राज्यात नर्सरी आणि पहिलीसाठी ‘इतकी’ वर्षे पूर्ण असणं बंधनकारक, कधीपासून अंमलबजावणी ?

राज्यात नर्सरी आणि पहिलीसाठी ‘इतकी’ वर्षे पूर्ण असणं बंधनकारक, कधीपासून अंमलबजावणी ?
Share

मुंबई- राज्य शासनाने राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या शाळा प्रवेशासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे. या नव्या नियमांनुसार प्रवेशासाठी बालकाचे निश्चित करण्यात आलेले वय ३१ डिसेंबर ऐवजी ३० जून रोजी पूर्ण असणे आवश्यक असणार आहे. हे नवे निकष शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू केले जाणार आहेत.

शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, संबंधित शैक्षणिक वर्षातील ३० जूनपर्यंत मुलांचे विहित किमान वय पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. हा निकष टप्प्याटप्प्याने लागू केला जाईल, ज्याची सुरुवात २०२७-२८ या शैक्षणिक वर्षातील नर्सरी प्रवेशापासून होईल, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

या निर्णयानुसार, २०२७-२८ पासून नर्सरी किंवा बालवाटिका-१ मध्ये प्रवेशासाठी मुलांचे वय किमान तीन वर्षे, २०२८-२९ पासून ज्युनिअर केजी (Junior KG) किंवा बालवाटिका-२ साठी चार वर्षे आणि २०२९-३० पासून सिनियर केजी (Senior KG) किंवा बालवाटिका-३ साठी पाच वर्षे असणे आवश्यक असणार आहे. मुख्याध्यापकांना पूर्व प्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान व कमाल वयोमर्यादेत १५ दिवसांची सूट देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

तसेच, इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान सहा वर्षे वयाची अट २०३०-३१ या शैक्षणिक वर्षापासून लागू होईल. शासनाच्या म्हणण्यानुसार, राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी बोर्डाशी संलग्न शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी वयाचे वेगवेगळे निकष पाळले जात होते. तसेच, पूर्व-प्राथमिक वर्गांमधील प्रवेशासाठी कोणतीही एकसमान किमान वयोमर्यादा नव्हती.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील तरतुदी आणि इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी मुलांचे वय सहा वर्षांपेक्षा जास्त असावे, या केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्याने हे वयोमर्यादेचे निकष निश्चित केले आहेत, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Vedh News