मद्यधुंद कार चालकाची तीन ते चार दुचाकींना धडक, महिला जखमी : कोथरूडमधील घटना

पुणे- दारूच्या नशेत भरधाव वाहन चालवून रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन ते चार दुचाकींना धडक दिल्याची घटना कोथरूड भागात घडली. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास कोथरूडमधील एमआयटी महाविद्यालयासमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. या अपघातात एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी वाहनचालकाला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.
वल्लभ बाळासाहेब बोडके (वय २४, रा. पानमळा, सिंहगड रोड, पुणे) असे संबंधित वाहनचालकाचे नाव आहे. तो एमएच १२ जेझेड ९६४६ क्रमांकाच्या वाहनातून एमआयटी कॉलेज रोडने पौड रोडच्या दिशेने जात असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडक दिली. या प्रकारामुळे परिसरात गोंधळ उडाला. अपघातानंतर नागरिकांनी कार अडवून चालकाला बाहेर काढले. त्याला चोप देत त्याचा मोबाईल व इतर गोष्टी काढून घेत पोलिसांच्या ताब्यात दिले.
तो दारूच्या नशेत वाहन चालवत होता का, याची खातरजमा करण्यासाठी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. संबंधित तरुण एमआयटी महाविद्यालयात शिकत असून, तो सिंहगड रस्ता परिसरात राहतो. अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.






