रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या व्यक्तीला मारहाण ; सात जणांविरुद्ध गुन्हा

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारणाऱ्या व्यक्तीला मारहाण ; सात जणांविरुद्ध गुन्हा
Share

पुणे – रुग्णालयातील बिलिंग विभागातील कर्मचाऱ्यांशी वाद घालून शिवीगाळ करणाऱ्यांना जाब विचारल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची घटना हडपसर परिसरात घडली. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी एका महिलेसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी रमीत राकेश गुप्ता (वय ३५, सध्या रा. मगरपट्टा सिटी, हडपसर, मूळ रा. जिंदल ग्लोबल सिटी, सोनीपत, हरयाणा) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांच्या फिर्यादीनुसार बेकायदा जमाव जमविणे आणि मारहाण केल्याप्रकरणी संबंधित महिलेसह तिचे नातेवाईक इब्राहिम शेख, मुन्ना शेख, गुड्डू शेख आणि खलिजा शेख यांच्यासह सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांचे नातेवाईक हडपसर परिसरातील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास गुप्ता हे त्यांच्या मित्रासह रुग्णालयाच्या बिलिंग विभागात पैसे भरण्यासाठी थांबले होते. त्यावेळी बुरखा परिधान केलेली एक महिला आणि तिचे नातेवाईक बिलिंग विभागात आले. रुग्णालयाच्या बिलावरून त्यांचा तेथील कर्मचाऱ्यांशी वाद सुरू झाला. यावेळी आरोपी रुग्णालयाच्या आवारात शिवीगाळ करीत होते.

बिलिंग विभागात रांगेत थांबलेल्या गुप्ता यांनी आरोपींना शिवीगाळ करू नका तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करू नका, असे सांगितले. या कारणावरून आरोपी संतापले. त्यांनी गुप्ता यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

मारहाणीच्या घटनेनंतर गुप्ता यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक एन. फाटे तपास करीत आहेत.

Vedh News