पती कामावरून घरी आला आणि…. ; घरात आढळले पत्नीसह दोन चिमुकल्यांचे मृतदेह अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

अहिल्यानगर- एका धक्कादायक घटनेने राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहर काल सोमवारी संध्याकाळी हादरून गेले. गणेशनगर येथील राहत्या घरात विवाहित महिला आणि तिच्या दोन चिमुकल्या मुलांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
वंदना गणेश गाडे (वय ३५), चैतन्य गणेश गाडे (वय ७ वर्ष) आणि जीवन गणेश गाडे (वय ३ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत वंदना यांचे पती गणेश गाडे हे रोजच्याप्रमाणे सोमवारी सकाळी सेंट्रिंगच्या कामासाठी घराबाहेर गेले होते. त्यांचा मोठा मुलगा चैतन्य हा शिक्षणासाठी आपल्या आत्याकडे राहतो, परंतु सोमवारी सकाळीच तो आईकडे घरी परत आला होता. सायंकाळी सातच्या सुमारास गणेश गाडे कामावरून घरी परतले असता घराचा मुख्य दरवाजा आतून बंद होता. त्यांनी बराच वेळ हाका मारल्या, दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
अखेर शंका आल्याने गणेश यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी आतमध्ये पत्नी वंदना आणि दोन्ही मुले निपचित पडलेली दिसली. तिघांचाही मृत्यू झालेला पाहून गाडे यांना प्रचंड धक्का बसला. गणेश गाडे यांनी घराच्या दरवाज्यातच हंबरडा फोडला.
घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनीही घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला.
या तिघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. प्राथमिक माहितीत आत्महत्येची शक्यता व्यक्त केली जात असली तरी मृत्यूचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास आता राहुरी पोलीस करत आहेत.






