एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन बेकायदा ; गुन्हे दाखल करण्याचा पोलीस आयुक्तांचा इशारा

पुणे- परवानगी न घेता पुण्यात आंदोलन करणाऱ्या एमपीएससी विद्यार्थ्यांची आंदोलने बेकायदा घोषित करण्यात आली असून, आंदोलकांवर कायदेशीर कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याचा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटी, रखडलेल्या भरती प्रक्रिया आणि परीक्षा पद्धतीतील वारंवार होणाऱ्या बदलांमुळे पुण्यातील लाखो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करत आहेत. पुण्यात एस एम जोशी पूल, लोकमान्य टिळक चौक, शास्त्री रस्त्यावर ही आंदोलने करण्यात येत आहेत. या आंदोलनाला राजकीय वळणही मिळाले असून विविध पक्षांचे नेते आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे या आंदोलनाच्या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असला तरी त्यासाठी पोलिसांची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवानगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. संबंधित आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारल्यानंतर पुणे पोलिसांनी सदाशिव पेठ, नवी पेठ आणि शनिवार पेठ परिसरातील आंदोलक ५१ विद्यार्थी आणि २९ शिकवणी (क्लासेस) व अभ्यासिका चालकांना नोटिसा बजावल्या आहेत.
तसेच आंदोलन परिसरात पोलिसांची परवानगी न घेता ड्रोनचा वापर करून चित्रीकरण करणाऱ्यांवरही कायदेशीर गुन्हे दाखल केले जात आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न रस्त्यावर बसून वाहतूक कोंडी करण्याऐवजी संविधानिक व कायदेशीर मार्गाने मांडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.






