पुणे – चंदुकाका सराफ अँड सन्स या दुकानातून सोने खरेदी करण्याचा बहाणा करुन १४ लाख ७८ हजार रुपयांची सोन्याची बिस्किटे घेऊन पळून गेलेल्या सराईत चोरट्याला चंदननगर पोलिसांनी चंद्रपूर येथून जेरबंद केले आहे.
सिद्धार्थ देविदास झेंडे (वय ३८, रा. म्हसोबाची वाडी, ता. इंद्रापूर) असे या चोरट्याचे नाव आहे.
चंदननगर येथील चंदुकाका सराफ या दुकानात ३ व ४ ऑगस्ट रोजी सिद्धार्थ झेंडे हा एका महिलेला घेऊन दागिने खरेदी करण्यासाठी गेला होता. आम्ही लग्न करणार असल्याचे सांगून ९६ लाखांचे दागिने खरेदी केले. त्याचा धनादेश दिला आणि नंतर दागिने घेऊन जातो, असे सांगून विश्वास संपादन केला.
दुसर्या दिवशी महिलेला धनादेश देऊन पाठवून १४ लाख ७८ हजार ७६० रुपयांचे सोन्याचे बिस्किटे खरेदी केली. मात्र त्याने दिलेला धनादेश खात्यात पैसे नसल्याने तो परत आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.
पोलिसांनी सिद्धार्थ झेंडे याच्याबरोबर आलेल्या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता झेंडे याने या महिलेला लग्न करण्याचे आश्वासन देऊन तिच्या बँक खात्यावरील धनादेशाचा वापर केल्याचे आढळून आले. पोलिसांनी तिच्याकडून आरोपीबद्दल माहिती घेतली असता तो गावी नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करुन आरोपी चंद्रपूर येथे असल्याची माहिती मिळवली.
पोलिसांनी चंद्रपूर येथे पथक पाठवून झेंडेला ताब्यात घेतले. सोन्याची बिस्किटे इंदापूर येथील एका सोनाराला विक्री करुन त्याच्याकडून रोख रक्कम घेतल्याची माहिती त्याने दिली. आरोपीकडून सोने विक्री करुन आलेल्या रोख रक्कमेपैकी ८ लाख ५० हजार रुपये जप्त करण्यात आले आहे.
सिद्धार्थ झेंडे हा प्रगती बिल्डकॉन कंपनीचा मालक असल्याचे सांगून लोकांचा विश्वास संपादन करुन फसवणूक करत असे. त्याने छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील अनेक कार व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक तसेच महिलांना लग्नाची आमिष दाखवुन त्यांची फसवणूक केली असल्याचे तपासामध्ये दिसून आले आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वी भिगवण पोलीस ठाणे व विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, सहायक पोलीस आयुक्त सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस अंमलदार रमेश मेमाणे, सचिन कदम, रामदास घावटे, किरण घुटे, प्रवीण भालचीम, माऊली लहाने यांनी केली आहे.
