गुंतवणूकीतून जास्त लाभाचे आमिष दाखवून ६३ लाखांची फसवणूक

बारामती – परदेशी व्यापारात गुंतवणूक केल्यास दरमहा २२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ६३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात पाच जणांसह अन्य एजंटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी करण राजेंद्र मोरे (वय ३७, रा. मंगळवार पेठ, फलटण, सध्या नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. मदन जहांगीर पाडवी, वंदनादेवी मदन पाडवी (दोघे रा. अशोकनगर, बारामती), अक्षय महादेव अहिवळे (रा. फलटण), सचिन बाळासाहेब डोंगरे (पत्ता अज्ञात) आणि अक्षय गोमासे (रा. नाशिक) यांच्याविरुध्द पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थातील हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीनुसार, आरोपींनी एस.पी.व्ही.एस. ग्रुप ऑफ ट्रेडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी व त्यांच्या पत्नीने वेळोवेळी ४८ लाख ४१ हजार रुपये गुंतवले. तसेच प्रियंका गवळी यांनी दोन लाख ६१ हजार, तर नितीश फुलंब्रीकर यांनी १२ लाख रुपये गुंतविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
परतावा व मूळ रक्कम मिळत नसल्याने विचारणा केली असता पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.






