दिवेआगार दुर्घटनेनंतर आळंदी येथील विनर्स अकॅडमीला सील ठोकण्याचे आदेश

दिवेआगार दुर्घटनेनंतर आळंदी येथील विनर्स अकॅडमीला सील ठोकण्याचे आदेश 
Share

आळंदी – रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी (दि. १) पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या ८ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली. सर्वजण पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी’ या खासगी कोचिंग क्लासचे विद्यार्थी होते. या दुर्घटनेनंतर विनर्स अकॅडमीवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 

पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील ‘विनर्स अकॅडमी’ या खासगी कोचिंग क्लासचे ४२ विद्यार्थी आणि २ शिक्षक (एकूण ४४ जण) दिवेआगर येथे सहलीसाठी आले होते. समुद्रकिनाऱ्यावर आनंद घेत असताना काही विद्यार्थी पोहण्यासाठी पाण्यात उतरले, मात्र पाण्याचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने अचानक समुद्राच्या तीव्र प्रवाहात ओढले गेले आणि बुडाले.

या दुर्घटनेनंतर विनर्स अकॅडमीबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासनाने केलेल्या प्राथमिक चौकशीत ही अकॅडमी आळंदी येथे मागील दोन वर्षांपासून सुरु असून आळंदी नगरपरिषदेकडून कोणताही अधिकृत व्यावसायिक किंवा शैक्षणिक परवाना घेतलेला नाही. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कायदेशीर नियम धाब्यावर बसवून कारभार सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी विनर्स अकॅडमीवर तात्काळ कारवाई करून ती सील करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच शहरातील इतर खासगी कोचिंग क्लास आणि शैक्षणिक संस्थांची सखोल चौकशीसाठी विशेष चौकशी समितीची स्थापना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालानंतर ज्या खासगी क्लासेस, शैक्षणिक संस्था यांच्याकडे वैध परवाने किंवा सुरक्षेच्या नियमांचे पालन केले जात नसेल तर अशा संस्था कायदेशीर कारवाई करून बंद केल्या जातील असे जाहीर केले आहे.

Vedh News