आपला शेजारी खरा पहारेकरी ! ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला ; खेड शिवापूर येथील घटना

आपला शेजारी खरा पहारेकरी ! ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसला ; खेड शिवापूर येथील घटना 
Share

पुणे – बुरखा घालून आलेल्या चार दरोडेखोरांनी हातात कोयते आणि बंदुका घेऊन दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवला. दुकान लुटण्याचा प्रयत्न करणार इतक्यात असे काही घडले की दरोडेखोरांना चोरी न करताच तिथून धूम ठोकावी लागली. भोर तालुक्यातील खेड-शिवापूर परिसरातील बांडेवाडी येथे शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राजगड पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. 

भोर तालुक्यात खेड-शिवापूर येथील बांडेवाडी परिसरातील ‘श्रीनाथ ज्वेलर्स’ दुकानात चार संशयित दरोडेखोर बुरखा घालून शिरले. त्यांनी कोयते आणि बंदुकांसारखी घातक शस्त्रे लपवून आणली होती. दुकानात प्रवेश करताच त्यांनी दुकानदाराला शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न सुरू केला.

बाजूच्या दुकानामधील दुकानदाराला या बुरखाधारी व्यक्तींच्या हालचाली अत्यंत संशयित वाटल्या. काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने त्याने ‘श्रीनाथ ज्वेलर्स’ दुकानात डोकावून पाहिले असता आत चाललेला प्रकार त्याच्या लक्षात आला. त्या धाडसी दुकानदाराने तातडीने मोठ्याने आरडाओरडा करून आसपासच्या लोकांना बोलवायला सुरुवात केली. हा आवाज ऐकताच दरोडेखोरांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी दुकानातून कोणताही ऐवज न घेताच ताबडतोब धूम ठोकली. यामुळे मोठा अनर्थ टळला.

राजगड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा त्वरित तपास करून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Vedh News