लोणावळ्यात बनावट कॉल सेंटर ; २० जणांना अटक, ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटर ; २० जणांना अटक, ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त
Share

लोणावळा- लोणावळ्यातील एका अलिशान व्हिलामध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या व्हिलामध्ये २० जण आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर कॉल सेंटर चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. लोणावळा शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करून या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अमेझॉन आणि गुगलसारख्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून अमेरिका, कॅनडासह अनेक देशांतील नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक या टोळीनं केली आहे.

मुंबईतील मालवणी (मालाड) आणि बदलापूर परिसरातील या तरुणांना अटक करण्यात आली आहे. अमान इम्तियाज शेख, नाजिश आरिफ शेख, रिहान सलम घनानी, महमंद अलीरजा सय्यद, तावीश मेहबूब अली शेख, कामरान इसामुद्दीन शेख, सद्दाम चांद खान, झाहिर वाहिद खान, जाहीद आजम शेख, शादाब जावेद सय्यद, इरफान अब्दुल गफूर शेख, समीर इरफान शेख, इशाद इरफान शेख, अमीर सिराज खान, मकसूद शमीम चौधरी, महमंद अफजल शेख, हर्शद शेख, अब्दुल आहात महमंद रफिक खान. कुलदीप मनोज बागडी, सुजल खुमबहादुर राणा, धनराज देवजित बोस, अशी त्यांची नावे आहेत.

नांगरगाव परिसरातील एका बंगल्यात काही व्यक्ती एकत्र येऊन बेकायदा कॉल सेंटर चालवत असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांना मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणावळा शहर पोलिसांच्या पथकाने संबंधित बंगल्यावर छापा टाकला.

पोलिसांनी पंचांसमक्ष बंगल्यात प्रवेश केला असता, काही व्यक्ती हेडफोन लावून लॅपटॉप आणि मोबाईलच्या साहाय्याने इंग्रजीत संभाषण व चॅटिंग करताना आढळल्या. लगतच्या खोलीतही अशाच प्रकारचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींकडे कॉल सेंटर चालविण्यासाठी आवश्यक अधिकृत परवानगीची समाधानकारक कागदपत्रे आढळून आली नाहीत. ‘देव व्हिला’ हा बंगला आरोपींनी संगनमताने भाड्याने घेतला होता. तिथे अत्याधुनिक इंटरनेट यंत्रणा, लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर करून परदेशातील नागरिकांना गंडा घातला जात होता. पोलिसांनी मारलेल्या छाप्यादरम्यान ३६ लाख ४१ हजार ३० रुपये किमतीचे लॅपटॉप, मोबाईल, वाहने आणि रोख रक्कम जप्त केली आहे.

आरोपी इंटरनेट कॉलच्या माध्यमातून अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांशी संपर्क साधत होते. अ‍ॅमेझॉन, गुगल यांसारख्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून विविध योजनांचे आमिष दाखविले जात होते. नागरिकांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यांची माहिती, क्रेडिट कार्ड आणि एटीएम कार्डसंबंधी तपशील मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या माहितीचा वापर करून बनावट बँकसंबंधित कागदपत्रे तयार केली जात असल्याचाही संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

काही नागरिकांना त्यांच्या नावाने मागविलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगून भीती दाखविली जात होती. अशा प्रकारे नागरिकांना मानसिक दबावाखाली आणून त्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि फसवणुकीची पद्धत उघड करण्यासाठी पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल फोन व लॅपटॉपची तपासणी सुरू केली आहे.

या संपूर्ण टोळीचा मुख्य सूत्रधार आणि कॉल सेंटरचा मालक इरफान अब्दुल गफूर शेख हा असून, तो ‘मो. फैज उर्फ नाजिश आरिफ शेख’ याच्या मदतीने हे रॅकेट चालवत होता. परदेशातील नागरिकांकडून उकळलेला पैसा थेट भारतात न आणता तो क्रिप्टोकरन्सी आणि हवालाच्या माध्यमातून भारतीय चलनात रुपांतरित केला जात असल्याचा गंभीर संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि इंडियन टेलिग्राफ कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, ते पोलीस कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश विधाते तसेच दोन्ही पथकांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Vedh News