ब्रेकिंग न्यूज

लायन्स क्लब पुणे भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी डॉ. सौम्या साबळे

Share

भोसरी – समाजसेवेची दोन दशकांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या लायन्स क्लब पुणे भोजापूर गोल्डच्या अध्यक्षपदी डॉ. सौम्या साबळे यांची नियुक्ती झाली आहे. लायन्स क्लब पुणे भोजापूर गोल्डने २० वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून २१ व्या सेवा वर्षात दिमाखदार प्रवेश केला आहे. या क्लबच्या माध्यमातून भोसरी–पिंपरी-चिंचवड परिसरात सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवला जात आहे.

यंदाच्या सेवा वर्षासाठी चार्टर प्रेसिडेंट डॉ. विलास साबळे यांच्या कन्या डॉ. सौम्या साबळे यांना द्वितीय उप प्रांतपाल तसेच ख्यातनाम उद्योजिका मालपाणी उद्योगसमूहाच्या संचालिका सुनीता मालपाणी यांनी पदाची शपथ दिली. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ सौम्या यांनी ज्येष्ठ सदस्यांचा अनुभव आणि युवा पिढीची ऊर्जा यांचा संगम घडवत समाजासाठी अधिक व्यापक, परिणामकारक आणि दीर्घकालीन सेवा प्रकल्प राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रसंगी डिस्ट्रिक्ट कॅबीनेट सेक्रेटरी मुरलीधर साठे यांनी नवीन ७ सदस्यांना लायन्स क्लब सदस्यत्वाची शपथ व दीक्षा दिली व त्यांचे भोजापूर परिवारात स्वागत केले. मुरलीधर साठे म्हणाले की, या क्लबचा सदस्य आणि माजी अध्यक्ष म्हणून मला माझ्या क्लबचा सार्थ अभिमान आहे. यंदा प्रांत ३२३४ डी-२ च्या डिस्ट्रिक्ट कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून बहुमान मला मिळाला आहे तो माझा व माझ्या क्लबचा सर्वोच्च बहुमान आहे. हा सन्मान आम्ही उत्कृष्ट सेवा, पारदर्शक प्रशासन आणि प्रभावी नेतृत्वाच्या बळावर सार्थ ठरवू. डॉ. सौम्या साबळे यांच्या नेतृत्वाखाली क्लब समाजसेवेचे नवे मापदंड निश्चित करेल, असा मला विश्वास साठे यांनी व्यक्त केला.

डॉ. विलास साबळे यांच्या चार्टर प्रेसिडेंट म्हणून त्यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या क्लबने गेल्या २० वर्षांत २० अध्यक्षांच्या माध्यमातुन शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, रक्तदान, नेत्रदान जनजागृती, गरजू विद्यार्थ्यांना मदत, वैद्यकीय सेवा आणि विविध सामाजिक उपक्रमांद्वारे हजारो गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविला आहे.

या सेवा वर्षात डॉ. विलास साबळे यांच्या मूळगावी राजेवाडी (भीमाशंकर परिसर) येथील दुर्गम भागातील शाळेला संगणकांची मदत, उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन तेथे शेततळे उभारण्यासाठी भरीव आर्थिक सहाय्य करण्यात आले. तसेच शिरूर तालुक्यातील नरकेवाडी येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, दोन होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत, वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय सेवेसाठी रोख मदत, व काही सामाजिक उपक्रम करून कार्याची सुरवात केली.

यावेळी जयश्री साठे, राजकुमार बिरादार, अनिल कातळे, कवी पुरुषोत्तम सदाफुले उपस्थित होते.