पिंपरी- एका नराधम पतीने आपल्या दिव्यांग पत्नीचा विविध प्रकारे शारीरिक छळ करून तसेच तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्य करून त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केल्याचा प्रकार मंगळवारी (१ सप्टेंबर ) उघडकीस आला आहे. संबंधित पती हा सराईत गुन्हेगार असून त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
याबाबतची माहिती अशी की, पीडित महिला दिव्यांग आहे. तिच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर तिची आरोपीसोबत ओळख झाली. त्यांचे प्रेमसंबंध सुरू झाले. त्या दोघांनी सहा वर्षांपूर्वी एका मंदिरात जाऊन लग्नदेखील केले. लग्नानंतर काही दिवसांपासून तो पीडित महिलेला त्रास देऊ लागला. त्या दोघांना एक मुलगा आहे. दरम्यान दोघे वेगवेगळे राहत होते. मुलगा कोणाकडे राहणार, यावरून त्या दोघांमध्ये मागील आठ महिन्यांपासून वाद होते. या वादातून आरोपीने पीडित महिलेला एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तिच्यासोबत आक्षेपार्ह कृत्य करून त्याचे व्हिडीओ काढले.
याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी आळंदी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यासाठी १० दिवस शिल्लक असतानाच त्याने हा गुन्हा केला.
तडीपार गुंड शहरात आला तरीदेखील पोलिसांना माहिती मिळाली नाही, यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
