दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या जोडप्याला लुटले, काही मिनिटातच पोलिसांनी…
पुणे – श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी येत असलेल्या दुचाकीस्वार दाम्पत्याला धमकावुन त्यांना लुटणार्या तिघा सराईत गुन्हेगारांना आंबेगाव पोलिसांनी पळून जाताना वाटेतच अडवून पकडले.
तौहिद असला शाह (वय २३), सुलेमान यासीन शेख (वय २१), रोहित बबलू सिंग (वय २०, तिघे रा. नेहरुनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही पिंपरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
याबाबत दादासाहेब तुळशीराम रासकर (वय ४६, रा. बांडेवाडी, खेडशिवापूर) यांनी आंबेगाव पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना जुन्या कात्रज बोगदा घाटात सातारा ते पुणे मार्गावर २९ सप्टेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गेली १० वर्षे दर चतुर्थीला श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी येतात. मंगळवारी हे नेहमीप्रमाणे पहाटे पत्नीसह मोटारसायकलवरुन पुण्याकडे येत असताना कात्रज जुना बोगदा ओलांडल्यानंतर आरोपींनी त्यांना अडवले. त्यांच्या गाडीची चावी काढून पत्नीच्या गळ्यातील १ लाख रुपयांचे मंगळसुत्र हिसकावले. त्यानंतर फिर्यादी निघून जाऊ लागताच त्यांनी त्यांचा पाठलाग सुरु केला.
नेकलेस पॉइंट जवळ त्यांनी महिलेकडील पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाठीमागून एक कार आली. त्यांनी हा प्रकार पाहून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते तेथून पुण्याकडे पळून जाऊ लागले. ही बाब आंबेगाव पोलिसांना समजताच पोलिसांनी गंधर्व लॉनसमोर गाडी आडवी लावून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी एका गाडीला धडक दिली. पण पोलिसांनी त्यांना जागेवरच पकडून चोरलेले मंगळसुत्र जप्त केले आहे. पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे तपास करीत आहेत.
