आरटीई प्रवेशासाठी खोटे रहिवासी पुरावे सादर केल्याचा आरोप; १४ पालकांवर गुन्हा
राजगुरूनगर- आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत आपल्या पाल्यांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी खोटे अथवा दिशाभूल करणारे रहिवासी पुरावे सादर केल्याच्या आरोपावरून खेड तालुक्यातील १४ पालकांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ ते मे २०२६ या कालावधीत राजगुरूनगर येथील पंचायत समितीच्या तालुका स्तरावरील आरटीई प्रवेश समितीकडे संबंधित पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठी रहिवासी पत्त्याची कागदपत्रे सादर केली होती. या कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या पाल्यांना आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत डॉ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पीस स्कूल (आळंदी, ता. खेड ) आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल ( आंबेठाण, ता. खेड ) येथे प्रवेश मिळवून देण्यात आले.
मात्र त्यानंतर प्रवेशासाठी सादर केलेल्या रहिवासी पुराव्यांमध्ये नमूद असलेल्या पत्त्यावर संबंधित पालक प्रत्यक्षात राहत नसल्याचे निदर्शनास आले. म्हणून प्रशासनाची दिशाभूल करून संबंधित पालकांनी आरटीईच्या माध्यमातून आपल्या पाल्यांसाठी प्रवेश मिळविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
खेडचे गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खेड पोलीस ठाण्यात संबंधित पालकांवर फसवणुकीचा आणि खोटे कागदपत्र सादर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ करीत आहेत.
