रस्त्याच्या कडेला फेकलेल्या बॅगेत आढळली ५ दिवसांची नवजात बालिका ; वाघोलीमधील धक्कादायक प्रकार

रस्त्याच्या कडेला फेकलेल्या बॅगेत आढळली ५ दिवसांची नवजात बालिका ; वाघोलीमधील धक्कादायक प्रकार
Share

पुणे – माणुसकीला काळिमा फासणारी घटना वाघोली आव्हाळवाडी परिसरात उघडकीस आली आहे. सातववस्ती येथे अवघ्या पाच ते सहा दिवसांच्या नवजात बालिकेला काळ्या रंगाच्या बॅगेत टाकून रस्त्याच्या कडेला सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका रिक्षा चालकाच्या सतर्कतेमुळे या बालिकेचा जीव वाचला आहे. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी आकाश कोळी यांनी फिर्याद दिली आहे. आकाश कोळी हे रिक्षाचालक असून २५ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास मांजरी येथून प्रवासी घेऊन पुणे स्टेशनच्या दिशेने जात होते. सातववस्ती परिसरात त्यांच्या रिक्षासमोर दुचाकीवरून जाणार्‍या दोन व्यक्तींनी रस्त्याच्या कडेला काळ्या रंगाची बॅग टाकून तेथून पलायन केल्याचे त्यांनी पाहिले. कोळी यांना संशय आल्याने त्यांनी रिक्षा थांबवून बॅगजवळ जाऊन पाहिले. बॅगेत पाय दिसत असल्याने आणि बाळाच्या रडण्याचा आवाज येत असल्याने त्यांनी बॅग उघडली.

त्यामध्ये पांढर्‍या कापडात गुंडाळलेली पाच ते सहा दिवसांची नवजात बालिका आढळून आली. कोळी यांनी बालिकेला बॅगसह तत्काळ वाघोली पोलीस ठाण्यात आणले. बालिकेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तातडीने तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुचाकीवरील दोन्ही व्यक्तींनी तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने त्यांची ओळख पटलेली नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Vedh News