शिरूर पोलीस ठाण्यात दोन हवालदार ए सी बी च्या जाळ्यात ; एकाला पकडले तर दुसरा पळाला 

शिरूर पोलीस ठाण्यात दोन हवालदार ए सी बी च्या जाळ्यात ; एकाला पकडले तर दुसरा पळाला 
Share

शिरूर – एकाच दिवशी शिरुर पोलीस ठाण्यातील दोन हवालदार लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडले. त्यापैकी एकाला पकडले तर दुसरा एसीबीची चाहूल लागताच लाचेची रक्कम घेऊन पसार झाला. 

शिवाजी ज्योतीराम बनकर (वय ४४, रा. स्वप्नपूर्ती निवास, घोलेगाव रोड, शिरुर) असे पकडलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तर सतीश नाथाराव मुंढे (वय ४६) असे लाच घेऊन पळून गेलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. त्याचा शोध घेतला जात असून शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या प्रकरणात तक्रारदार व त्यांचे आई, वडिलांच्या विरोधात शिरुर पोलीस ठाण्यात (१९ ऑगस्ट २०२६) अतिक्रमण करुन मालमत्तेचे नुकसान केल्याचा गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिवाजी बनकर याच्याकडे आहे. तक्रारदार व त्यांच्या आई वडिलांना अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी हवालदार बनकर याने तक्रारदारांकडे १५ हजारांची लाच मागितली. तक्रारदार यांनी अटकेच्या भितीने बनकर याला ५ हजार रुपये दिले.

पुन्हा दहा हजारांची मागणी झाल्यानंतर तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली. याची एसीबीने पडताळणी केली. जुने शिरुर पोलीस ठाण्यात सापळा कारवाईत तक्रारदाराकडून ४ हजार रुपये घेण्याचे मान्य करुन उर्वरित ११ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी पोलिस हवालदार बनकर याला ११ हजार रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहात पकडले.

दुसऱ्या प्रकरणात शिरुर पोलीस ठाण्यात तक्रारदार व त्यांचे कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार मुंढे याच्याकडे आहे. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबियांना अटक न करण्यासाठी व गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी मुंढे याने १ लाख रुपयांची लाच मागितली.

तक्रारदारांने यासंदर्भात एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीने केलेल्या पडताळणीत मुंढे याने स्वत:साठी व वरिष्ठांच्या नावाने सुरुवातीला १ लाख रुपये व नंतर तडजोडीअंती ९५ हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदाराकडून सतीश मुंढे याने ९५ हजार रुपये स्वीकारले. त्यावेळी सापळा पथकाची चाहूल लागताच लाच रक्कम घेऊन तो पळून गेला आहे. त्याचा शोध घेतला जात असून शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील, उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शैलजा शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Vedh News