ग्राहक बनून सामान घेता घेता चोरटयांनी किराणा दुकानातील महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

ग्राहक बनून सामान घेता घेता चोरटयांनी किराणा दुकानातील महिलेचे मंगळसूत्र हिसकावले
Share

बारामती- किराणा दुकानात ग्राहक बनून खरेदी करता करता दोन अनोळखी चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे सहा लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून नेले. ही घटना बारामतीतील जळोची परिसरातील मोरयानगर येथे घडली.

याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नमिता निर्मलकुमार गांधी (वय ६२, वर्धमान ट्रेडर्स, भिगवण रोड, जळोची, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास नमिता गांधी या वर्धमान ट्रेडर्स या किराणा दुकानात होत्या. त्यावेळी सुमारे २५ ते ३० वर्षे वयाचे दोन अनोळखी इसम दुकानात आले. त्यापैकी एकाने हेल्मेट घातले होते, तर दुसऱ्याने चेहऱ्यावर पांढरा रुमाल बांधला होता आणि फुलबाह्यांचा पिस्ता रंगाचा शर्ट घातला होता.

दोघांनी प्रथम दूध, त्यानंतर पाण्याची बाटली, सिगारेट, कॅडबरी आदी वस्तू मागितल्या. त्यानंतर एका इसमाने कुरकुरे मागितले. कुरकुरे देण्यासाठी नमिता गांधी त्याच्यासमोर गेल्या असता, त्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसका मारून तोडले आणि मोटारसायकलवरून आलेल्या साथीदारासह तेथून पळ काढला.

Vedh News