दिवंगत वडिलांना कायम आपल्याजवळ ठेवायचे म्हणून मुलीने केले धक्कादायक कृत्य ; मुंबईतील घटना

दिवंगत वडिलांना कायम आपल्याजवळ ठेवायचे म्हणून मुलीने केले धक्कादायक कृत्य ; मुंबईतील घटना
Share

मुंबई- मुलीला आपल्या वडिलांना कायम आपल्याजवळ ठेवायचे होते. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर तिने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्यांचा मृतदेह जतन केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईच्या मालाड भागातून समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेला ताब्यात घेतले आहे.

मुंबईच्या मालाड पूर्व भागातील एका इमारतीबाहेर ‘डे केअर सेंटर लवकरच सुरू होत आहे’ असा बोर्ड लावण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात सेंटर सुरू झालेले नव्हते. इमारतीचे लोखंडी गेट बंद होते आणि आत जाण्याचा मार्गही बंद करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून या डे केअर सेंटरमधून दुर्गंधी येत असल्याचे निदर्शनास आले. स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली असता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

आत प्रवेश करताच पोलिसांना एका खोलीत मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपास केला असता संबंधित मृत व्यक्तीच्या मुलीला आपल्या वडिलांना कायम आपल्याजवळ ठेवायचे होते. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी मृतदेह जतन करण्याचा निर्णय तिने घेतला. यासाठी परदेशातील एका कंपनीची मदत घेऊन मृतदेह प्रिझर्व्ह करण्यात आला होता.

मृतदेह जतन करण्यामागची नेमकी प्रक्रिया, संबंधित महिलेची भूमिका तसेच या प्रकरणातील कायदेशीर बाबींची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. कौटुंबिक परिस्थितीचाही तपास केला जात आहे. पोलिसांच्या तपासानंतर या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई स्पष्ट होणार आहे.

Vedh News