रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरडा करून एकमेकांशी झटापट करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा, एकाला अटक

चाकण- चाकणमधील आंबेठाण रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी सहा जणांनी आपापसांत झोंबाझोंबी करून मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या गोंधळामुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याने उत्तर चाकण पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी एकाला अटक केली आहे.
नागनाथ गोविंद चवकुंटले (वय २१), रमेश व्यंकट वाघमोडे (वय १८), ओमकार बापूराव चाकटवाड (वय १९), रमाकांत गोविंद सलगरे (वय २४), मोहित चंद्रकांत कोळेकर (वय २३) आणि निखिल भागवत सातव (वय २०) अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी मोहित चंद्रकांत कोळेकर याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सुभाष दत्तात्रय डमाळ (वय ३७, पोलीस शिपाई, चाकण उत्तर पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, बुधवारी (दि. २८) रात्री सुमारे सव्वाआठच्या सुमारास डीसी पेट्रोल पंपाजवळ सहा जणांनी आपापसांत झटापट करीत मोठमोठ्याने आरडाओरडा करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातला. त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होत असल्याने पोलिसांनी सहाही जणांविरुद्ध कारवाई करून एकाला अटक केली आहे.






