ब्रेकिंग न्यूज

भरधाव कार ओढ्यात कोसळून पुण्यातील दोन तरुणांचा दुर्दैवी अंत, कार्ला फाट्यावर झाला अपघात 

Share

लोणावळा – भरधाव वेगातील कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला जोरात धडकली. यानंतर गाडी थेट रस्त्यालगतच्या ओढ्यात कोसळली.

जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (२७ ऑगस्ट) पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या भीषण दुर्घटनेत पुण्यातील दोन तरुणांचा तडफडून मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे.

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत ‘सुरज ढाब्या’समोर ही दुर्घटना घडली. हुसेन शब्बीर गोधरावाला (वय २७, रा. कोंढवा, पुणे) आणि आसीर असगरअली इनामदार (वय २६, रा. नेहरूनगर, पुणे) अशी मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणांची नावे आहेत. कार चालवणारा अनिकेत गौतम बरवा हा तरुण या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत बरवा कार चालवत होता. पहाटेच्या वेळी कार भरधाव वेगात असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. कार दुभाजकावर आदळून थेट शेजारील ओढ्यात जाऊन पडली. धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. गंभीर दुखापत झाल्यामुळे कारमधील हुसेन आणि आसीर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार गोकुळ भास्कर खेडकर यांनी फिर्याद दिली आहे. कारचालक अनिकेत बरवा याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत