ब्रेकिंग न्यूज

शिल्पाची आत्महत्या नसून हत्याच? माहेरच्या मंडळींचा दावा, बेडरूमच्या दरवाजाने संशय बळावला 

Share

पिंपरी – वाकड परिसरात एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. सासरच्या छळाला कंटाळून तिने आपले जीवन संपवले. मात्र या प्रकरणाला गंभीर वळण लागले असून ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा शिल्पाच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.

माहेरहून पैसे आणण्यासाठी आणि वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून शिल्पा सचिन गवारे (वय ४२, रा. ईशान सोसायटी, वाकड) या विवाहित महिलेने गळफास घेऊन जीवन संपवलं होतं. ही घटना गुरुवारी (२७ ऑगस्ट) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वाकड येथील ईशान सोसायटीमधील ‘प्रथम’ बंगल्यात उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली.

याप्रकरणी तिचे भाऊ संतोष गुलाब कलाटे (वय ४७, रा. दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मृत महिलेचा पती सचिन उत्तम गवारे, सासरा उत्तम शिवराम गवारे, सासू संजीवनी उत्तम गवारे आणि दीर संदीप उत्तम गवारे या सर्वांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे व छळवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

शिल्पा यांचा विवाह २००९ मध्ये सचिन गवारे याच्याशी झाला होता. विवाहाच्या वेळी सासरच्या मंडळींनी सचिनवर पूर्वी एका खुनाचा गुन्हा दाखल असून खटला सुरू असल्याची माहिती लपवून ठेवली होती. लग्नानंतर या गुन्ह्यात त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊन तो चार वर्षे तुरुंगातही राहिला होता. सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी शिल्पा यांच्याकडे माहेरहून पैसे आणण्याचा तगादा सुरू केला. पती सचिन दारू पिऊन सतत तिला बेदम मारहाण करत असे, तर सासू संजीवनी चारित्र्यावर संशय घेत तिचा मानसिक छळ करत होती असे फिर्यादीमध्ये नमूद आहे. शिल्पाच्या भावाने वेळोवेळी सासरच्या लोकांना रोख रक्कम तसेच व्यवसाय आणि प्लॉट खरेदीतही आर्थिक मदत केली. मात्र, काही दिवसांपूर्वी शिल्पा यांनी माहेरच्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर भावांच्या बाजूने सह्या केल्याचे समजताच सासरच्यांनी “तुझ्या बापाच्या मालमत्तेत हिस्सा घे,” अशी धमकी देत तिचा आणखी छळ सुरु केला.

गुरूवारी मध्यरात्री सासरच्या लोकांनी शिल्पा यांनी बेडरूममधील सिलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे माहेरच्यांना सांगितले आणि त्यांना खासगी रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. परंतु, बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवून गळफास कसा घेतला जाऊ शकतो? असा सवाल उपस्थित करत माहेरच्यांनी या मृत्यूबाबत तीव्र संशय व्यक्त केला आहे. ही आत्महत्या नसून सासरच्यांनीच तिची हत्या केली असावी असा गंभीर आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.