पुणे – पुढील काही दिवसात गणरायाचे आगमन होणार आहे. त्याच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यात डीजे बंदीवर मोठी घोषणा केल्यामुळे पोलीस आणि मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात वाद पेटला आहे. आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन डीजेबद्दल भूमिका स्पष्ट केली.
पुण्याचे पोलीस ‘प्रदूषण मंडळाकडून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या नुसार सगळे सण उत्सव साजरे करणे अनिवार्य आहे. प्लाझ्मा आणि प्रेशर मिड या वस्तूंचे डेसिबल खूप जास्त आहेत हे निदर्शनास आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयात याबाबत टेस्टिंग सुद्धा झाली. गणेश मंडळांकडून सुद्धा प्लाझ्मा, प्रेशर मिड, लेसर बद्दल सुद्धा या गोष्टी वापरणार नाही याबाबत चर्चा झालेली आहे’ अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. त्यामुळे पुण्यात प्रेशर मिड आणि प्लाझ्मावर १०० टक्के बंदी असणार आहे, असं आयुक्तांनी मंडळांना ठणकावून सांगितले आहे.
तसेच ४ बेस, ४ टॉप विसर्जन मिरवणुकीत वापरले जातील यापेक्षा जास्त कोणी वापरणार नाही, असे गणेश मंडळानी सांगितलं आहे. त्याबद्दल विचार विनिमय सुरू आहे. मोकळ्या जागेत जिथे स्थिर कार्यक्रम आहेत, तिथे ६ बेस ६ टॉप लावण्यासाठी काही मंडळांचा आग्रह आहे, त्याबद्दल सुद्धा चर्चा सुरू आहे, असं आयुक्तांनी स्पष्ट केले.
विसर्जन मिरवणुकीत किती ढोल ताशा पथके लावायची याबद्दल लवकर निर्णय होईल. लक्ष्मी रोड वरून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या १८० ते १९० मंडळाशी सुद्धा चर्चा सुरू आहे. पोलिसांचे सर्व निर्णय सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर घेतले जातील असे आयुक्तांनी सांगितले.
