हॉर्न वाजवला म्हणून लोखंडी रॉडने एसटी बसच्या काचा फोडल्या चाकणमध्ये कारचालकाचा धिंगाणा

पुणे – एसटी बसचालकाने हॉर्न वाजवल्यानं एका कारचालकाचा पारा चढला. त्याने संतापाच्या भरात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव एसटी बसची रस्त्यातच तोडफोड केली. इतकंच नाही तर प्रवाशांच्या खिडक्यांच्या काचांचा चक्काचूर केला. हा प्रकार चाकण बस स्थानकाजवळ घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकण स्थानकातून एक एसटी बस प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी निघाली होती. चाकण-तळेगाव रस्त्यावर वाहतूक सुरू असताना, एसटी बसचालक असिफ शफी पटेल (वय ४९, रा. राजुरी, ता. जुन्नर) रस्ता मिळावा म्हणून पुढील वाहनाला हॉर्न वाजवला. बसचालकाने वाजवलेल्या हॉर्नचा पुढे चाललेल्या कारचालकाला प्रचंड राग आला. त्याने आपली कार थेट एसटी बससमोर आडवी घालून एसटीचा रस्ता रोखला.
नंतर तो कारमधून खाली उतरला आणि हातातील लोखंडी रॉडच्यासहाय्याने त्याने बसच्या समोरील भागावर आणि प्रवासी बसलेल्या खिडक्यांच्या काचांवर जोरदार प्रहार करत त्या फोडून टाकल्या. अचानक काचांचा चुराडा झाल्याने बसमधील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. एवढ्यावरच न थांबता या व्यक्तीने बसमधील प्रवाशांनाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
बसचालकानं लगेचच चाकण पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे. कुणाल बाळासाहेब डफळ (वय ३०, रा. रासे, ता. खेड) असे या ताब्यात घेण्यात आलेल्या कारचालकाचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे चाकण परिसरातील गुंडगिरीवर पोलिसांचा वचक उरला आहे का, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.






