ब्रेकिंग न्यूज

कंटेनरने तीन वाहनांना दिली भीषण धडक ; खासदार निलेश लंके यांच्या मित्रासह एकाचा जागीच मृत्यू

Share

पुणे- भरधाव कंटेनरने दिलेल्या भीषण धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पुणे- अहिल्यानगर रस्त्यावर शिरूरजवळ संग्राम हॉटेलसमोर घडला. या अपघातात खासदार निलेश लंके यांच्या जिवलग मित्राचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, एक भरधाव कंटेनर अत्यंत वेगात आला आणि त्याने समोरून येणाऱ्या वाहनांना उडवले. या विचित्र दुर्घटनेत एसटी महामंडळाची बस, एक फोर्ड एंडेव्हर कार, दुचाकी आणि अपघातग्रस्त कंटेनर अशा एकूण चार गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने त्यांनी तातडीने मदत व बचावकार्य सुरू केले. तसेच, महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूकही पूर्ववत केली.

या अपघातात खासदार निलेश लंके यांचे जिवलग मित्र वाडेगव्हाण येथील नामांकित व्यावसायिक किशोर यादव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वाडेगव्हाण आणि संपूर्ण शिरूर पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. यादव यांच्या अपघाताचे वृत्त समजताच निलेश लंके यांनी दुःख व्यक्त केले. आहे. “किशोरभाऊ आणि माझे नाते केवळ राजकीय किंवा सामाजिक कामापुरते मर्यादित नव्हते. एक जिवलग सहकारी म्हणून त्यांनी प्रत्येक प्रसंगी माझी साथ दिली. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे आणि आपुलकीच्या वागण्यामुळे ते सदैव माझ्या मनात विशेष स्थान ठेवून राहतील”

अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.