ट्रॅव्हल्स बसमुळे निगडीमध्ये वाहतूक कोंडी ; सुलभा उबाळे यांची ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या प्रतिनिधींशी खडाजंगी

निगडी- निगडीतील यमुनानगर परिसरात एलआयसी कॉर्नर ते टिळक चौक या मार्गावरील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर नगरसेविका तथा शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे अक्रम झाल्याचे पाहायला मिळाले. रस्त्यावर अनधिकृतपणे उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावरून त्यांनी वाहतूक शाखेच्या बैठकीत ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या प्रतिनिधींना धारेवर धरले.
निगडीतील यमुनानगर परिसरात एलआयसी कॉर्नर ते टिळक चौक या मार्गावर अनधिकृतपणे खासगी ट्रॅव्हल्स बस उभ्या केल्या जात असल्यामुळे या ठिकाणी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेषतः सायंकाळच्या वेळी कामावरून घरी परतणारे कामगार आणि स्थानिक नागरिकांची या मार्गावर मोठी गर्दी असते. त्यात रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्स बसमुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
या समस्येबाबत सुलभा उबाळे यांनी 2 सप्टेंबर 2026 रोजी वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्तांना लेखी निवेदन देऊन संबंधित ट्रॅव्हल्स बसवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच या बस पर्यायी मार्गाने वळविण्याची सूचनाही केली होती. मात्र, समस्या कायम असल्याने त्यांनी वाहतूक शाखेच्या बैठकीत हा मुद्दा आक्रमकपणे मांडला. यावेळी सुलभ उबाळे आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या.
ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या प्रतिनिधींशी त्यांची जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई करावी, ट्रॅव्हल्स बससाठी पर्यायी थांब्यांची व्यवस्था करावी आणि यमुनानगरमधील वाहतूक कोंडी दूर करावी, अशी मागणी सुलभ उबाळे यांनी केली.
या बैठकीला नगरसेवक उत्तम केंदळे, बापू घोलप यांच्यासह टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.






