आधी सोशल मीडियावर तरुणीशी मैत्री, नंतर दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाचे आमिष दाखवून…

पुणे- आधी मीडियावर मैत्री करून विश्वास संपादन केला. नंतर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीची १ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बुधवार चौक परिसरात घडली आहे.
ओमकार तातिया (वय अंदाजे २२, रा. पुणे) असे फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित २३ वर्षीय तरुणीची इन्स्टाग्रामवर ओमकार तातिया याच्याशी ओळख झाली होती. सोशल मीडियावरील संवादातून दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली. काही काळानंतर आरोपीने तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शन घडवून आणण्याचे आणि पूजा करून देण्याचे आमिष दाखवले.
या आमिषाला बळी पडून तरुणी २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास बुधवार चौकात पोहोचली. तेथे बुधवार चौकातील गणराज लॉजसमोर आरोपी तिच्या भेटीला आला. यावेळी त्याने तरुणीला दुचाकी पार्किंग करून देतो, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणीने आपली दुचाकी त्याच्या ताब्यात दिली.
मात्र, दुचाकी घेऊन गेलेला आरोपी बराच वेळ होऊनही परतला नाही. त्यामुळे तरुणीला संशय आला. दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेला ४० हजार रुपयांचा मोबाईल फोन, ७ हजार रुपये रोख रक्कम, तसेच पर्समधील आधार कार्ड, पॅन कार्ड आणि डेबिट-क्रेडिट कार्ड असा एकूण १ लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याचे तिच्या लक्षात आले. पुढील तपास सुरु आहे.







