मंचर पोलीस ठाण्यात १४ जणांनी शिवीगाळ करून घातला राडा, गुन्हा दाखल

मंचर पोलीस ठाण्यात १४ जणांनी शिवीगाळ करून घातला राडा, गुन्हा दाखल
Share

मंचर – मंचर पोलीस ठाण्यात १४ जणांनी एकत्र येत मोठ्याने आरडाओरडा, बाचाबाची आणि शिवीगाळ करून प्रचंड गोंधळ घातल्याचा प्रकार बुधवारी (ता. २५) घडला. अदखलपात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने समजूत काढण्याचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी मंचर पोलिसांनी १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अनिल रमेश वाळुंज, उज्वला रमेश वाळुंज (रा. जवळे), जनाबाई सुरेश रांडे (रा. घोडेगाव), मयूर विष्णू चासकर (रा. लांडेवाडी), संगीता सागर खांडगे (रा. पिंपळगाव तर्फे नारायणगाव), शिवानी गणेश कुलकर्णी, धनश्री ओंकार पोखरकर, गणेश बाळू कुलकर्णी, ओंकार काळूराम पोखरकर, अनिता काळूराम पोखरकर (रा. पिंपळगाव खडकी), उषा राजेंद्र मोरे (रा. धनगरवाडी, ता. जुन्नर), आदित्य रामदास शिंदे (रा. एकलहरे), सागर सताडू खांडगे (रा. पिंपळगाव तर्फे नारायणगाव) आणि विजय शांताराम पोखरकर (रा. कळंब) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल फिरोज अब्दुल मोमीन यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ११.३० ते दुपारी १ या वेळेत मंचर पोलीस ठाण्यात रांजणी बीटचे अंमलदार पोलीस हवालदार अशोक लोखंडे आणि पोलीस हवालदार एस.बी. इंदे हे अदखलपात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंधित विरोधक व तक्रारदार यांची समजूत काढून शांत राहण्यास सांगत होते. त्यावेळी आरोपींनी एकत्र येऊन पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घातल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

यावेळी आरोपी अनिल वाळुंज याने शिवानी कुलकर्णी हिला मागून येऊन लाथ मारून शिवीगाळ केल्याचा, तर उज्वला वाळुंज हिने रागाच्या भरात पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार कक्षासमोरील सिमेंटच्या पिलरवर डोके आपटून पोलिसांना धमकी दिल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे. पोलिसांनी वारंवार समजावून सांगूनही संबंधितांनी ऐकले नाही. एकमेकांच्या अंगावर धावून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांनी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून सुरू असलेला वाद मिटविला. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात ता.२५ नोव्हेंबर रोजी दुपारी २.२९ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक महादेव नारायण वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई अशोक लोखंडे तपास करीत आहेत.

Vedh News