पुण्यात शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबार, चार ते पाच जणांकडून तरुणावर कोयत्याने हल्ला

पुणे- पुण्यात शिवाजीनगर कोर्टाबाहेर भरदिवसा एका तरुणावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाल्याची थरारक घटना घडली असून कोर्टाचा परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर कोर्टाबाहेरील गेट नंबर ४ वर दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली. जखमी झालेल्या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मंदार किवळे (वय अंदाजे ३० रा. कात्रज ) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे दोन्ही हात तुटल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सव्वा एकच्या सुमारास न्यायालयाच्या ४ नंबर प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या मंदार किवळे याच्यावर दोन दुचाकींवरून आलेल्या ४ ते ६ अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढवला. हल्लेखोरांनी सुरुवातीला पिस्तुलातून गोळीबार केला आणि त्यानंतर मंदार याचा पाठलाग करून त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की या हल्ल्यात मदार याचे दोन्ही हात तुटल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला जुन्या वादातून किंवा पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळी दोन पिस्तूल आणि काडतुसांनी भरलेली मॅगझीन टाकून सुझुकी ॲक्सेस आणि ॲक्टिव्हा दुचाकींवरून पळ काढला.
जखमी मंदार किवळे याला पोलिसांनी तातडीने रिक्षातून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, गुन्हे शाखेचे पथक, फॉरेंसिकची टीम घटनास्थळी दाखल झाली. तातडीने न्यायालयाचा परिसर सील करण्यात आला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली असून, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे न्यायालय परिसरात खळबळ उडाली असून पूर्ण परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती.







