न्यायालयाने शिक्षा सुनावताच आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या ; नवी मुंबई न्यायालयातील घटना

न्यायालयाने शिक्षा सुनावताच आरोपीची पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या ; नवी मुंबई न्यायालयातील घटना 
Share

नवी मुंबई- हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीने न्यायालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २३) नवी मुंबईतील बेलापूर न्यायालयात घडली. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. गंभीर जखमी झालेल्या आरोपीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नागेश बाबू लाड (वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे) असे मृत आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागेश बाबू लाड याला २०१९ मध्ये नेरुळ पोलिसांनी हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली होती. त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ आणि ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात हत्या आणि हत्येचा प्रयत्न असे गंभीर आरोप होते. अटकेनंतर या खटल्याची सुनावणी बेलापूर न्यायालयात सुरू होती.

या प्रकरणाची सुनावणी गेल्या सात वर्षांपासून बेलापूर न्यायालयात सुरू होती. सोमवारी या खटल्याचा निकाल लागला. न्यायाधीश प्रसन्ना चांदगुडे यांच्या न्यायालयाने नागेश बाबू लाड याला दोषी ठरवले. त्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर नागेशने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली उडी मारली. उंचावरून पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे न्यायालय परिसरात उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनेनंतर जखमी नागेशला तातडीने मदत देत नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Vedh News